मोळी टाकण्याच्या अगोदर नीरा भीमा, कर्मयोगी कारखान्याकडून घोषणा
इंदापूर/बिजवडी – इंदापूर तालुक्यातीलशहाजीनगर येथील नीरा भीमा व बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना यांच्याकडून गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याअगोदरच सन 2023-24 च्या गळीत हंगामामध्ये गळीत होणाऱ्या ऊसापोटी बिलाचा पहिला हप्ता रु. 2500 प्रमाणे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
ऊस बिलाचे पुढील हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे दिले जातील.कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना आगामी गळीत हंगामात ऊस दरात आघाडीवर राहील, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.30) दिली. कर्मयोगी कारखाना चालू गळीत हंगामामध्ये कितीही अडचणी आल्या तरी 9 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पूर्ण करेल.
कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असून गळीत झालेल्या उसाची तसेच तोडणी व वाहतूकीची सर्व बिले वेळेवर व काटेकोरपणे हंगाम संपेपर्यंत दिली जातील.कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला नियमितपणे होत असून दिवाळीसाठी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाणार आहे, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. तर नीरा भीमा कारखाना चालू होणाऱ्या गळीत हंगामात इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देणार आहे.
कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल. त्यादृष्टीने संचालक मंडळाने नियोजन केले आहे. कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून, कारखाना आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत आहे.
-लालासाहेब पवार, अध्यक्ष, नीरा-भीमा कारखाना