फलटण – पवारवाडी (मुंजवडी), ता. फलटण येथे झालेल्या मारहाणीत सीताबाई किसन सस्ते (वय 60) यांच्या पोटात चाकूने वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोली ठाण्यात तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. प्रमिला सोमनाथ सस्ते (रा. पवारवाडी, मुंजवडी, ता. फलटण) या पती सोमनाथ आणि सासूबाई सीताबाई किसन सस्ते यांच्यासमवेत घरात टीव्ही पाहत बसल्या होत्या. त्यावेळी रमेश तानाजी घुले, स्वाती रमेश घुले आणि तानाजी राजाराम घुले हे अचानक सस्ते यांच्या घरात घुसले. रमेश घुले याने धारदार चाकूने सोमनाथ सस्ते यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचवण्यासाठी प्रमिला सस्ते व सीताबाई सस्ते यांनी रमेश घुलेला अडवले.
त्यावेळी सोमनाथ सस्ते घराबाहेर पळून गेल्याने चिडलेल्या रमेश घुलेने सीताबाई घुले यांच्या पोटात चाकूने वार केला.
यात गंभीर जखमी झालेल्या सीताबाई सस्ते यांना पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले (रा. मुंजवडी) यांच्याविरोधात सौ. प्रमिला सस्ते यांनी फिर्याद दाखल केली. पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे तपास करत आहेत.