नवी दिल्ली : पंजाबमधील अमृतसर दोन दिवसात दुसऱ्यांदा पुन्हा स्फोटानी हादरल्याची घटना समोर आली आहे. दरबार साहिब हेरिटेज स्ट्रीटजवळ आज सकाळी आणखी एक स्फोट झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेपासून 200 मीटर अंतरावर हा स्फोट झाला असून पोलिस घटनेचा तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
श्री हरिमंदिर साहिब जवळील हेरिटेज स्ट्रीट परिसरात आज सकाळी 6:30 वाजता पुन्हा स्फोट झाला आहे. घटनेच्या वेळी रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा तपास सुरू आहे.
Punjab | Bomb Squad and FSL team at the spot after a suspected bomb explosion was reported near Golden Temple in Amritsar https://t.co/EBubbzqAFU pic.twitter.com/yx0dROANqw
— ANI (@ANI) May 8, 2023
फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांनी अनेक नमुने ताब्यात घेतले आहेत. जिथे स्फोट झाला, तिथे एक कारही उभी होती, ज्याच्या काचा फुटल्या होत्या. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. डीसीपी परमिंदर सिंग भंडल हेही हेरिटेज स्ट्रीटवर तपासासाठी घटनास्थळी पोहोचले.
या अगोदर शनिवारी रात्री उशिरा सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवरही स्फोट झाला होता. यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे तर काही इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. मात्र, हा दहशतवादी हल्ला नसून अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.