गांधीनगर – पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने त्याच दिवशी पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात घडली आहे. धवल राठोड असे पतीचे नाव असून प्रिन्सी असे पत्नीचे नाव आहे. 6 महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रेमविवाह झाला होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमरेली जिल्ह्यातील लिलीया गावात धवल राठोड हे आपल्या कुटुंबासमवेत राहण्यास होते. 6 महिन्यांपूर्वी प्रिन्सी यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. रविवारी त्यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि जागीच मृत्यू झाला.
धवल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती. अंत्यविधीसाठी नातेवाई आले होते. धवल यांचे आई-वडील यांचे सर्वजण सांत्वन करत होते. त्याचवेळी पत्नी प्रिन्सी या घरात गेल्या. बराच वेळ झाला तरीही त्या बाहेर न आल्याने नातेवाईक त्यांच्या सांत्वनासाठी घरात गेले असता त्यांनी प्रिन्सी यांना गळफास घेतलेल्या लटकलेल्या अवस्थेत पाहिले. एकाच दिवशी पती आणि पत्नी दोघांचीही अंत्ययात्रा काढावी लागली. या घटनेने कुटुंबिय आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रिन्सी आणि धवल यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही एकमेकांवर अतोनात प्रेम करत असत. धवल यांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.