मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट गेल्या काहीदिवसांपासून चर्चेत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट नवनवीन विक्रम करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे याच चित्रपटावरून राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाय हा चित्रपट दोन गटात विभागला गेला आहे. एका गटाला हा चित्रपट वास्तववादी वाटतो आहे तर दुसऱ्या गटाला काल्पनिक वाटत आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठे विधान केले आहे. माझी आर्थिक परिस्थिती असती, तर गुजरात फाईल्स मीच हाती घेतला असता असे ते म्हणाले आहेत.
अमोल मिटकरी म्हणाले की, ”काश्मीर फाईल्सपेक्षा गुजरात फाईल्स फार भयंकर आहे. मुजफ्फरनगरची दंगल असो, गोध्रा हत्याकांड असेल, सोहराबुद्दीन प्रकरण असेल, यांवरही चित्रपट निघायला हवा, माझी वारंवार मागणी आहे. माझी आर्थिक परिस्थिती असती, तर गुजरात फाईल्स चित्रपट मीच हाती घेतला असता.” द काश्मीर फाईल्स चित्रपटातून घेण्यासारखं काहीच नाही, असेही मिटकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, याआधी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कापरी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटवरुन गुजरात फाइल्स चित्रपट बनवण्यास आपण तयार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.