आढळरावांचा चौकार रोखण्यात अमोल कोल्हेंना यश

…अन्‌ आव्हान हळूहळू कमी झाले

या निवडणुकीत उमेदवार कोणी असला, तरी चौकार लगावणारच असा निश्‍चय शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, निवडणुकीच्या प्रचारात रंग भरू लागताच त्यांचे हे आव्हान हळूहळू कमी होत गेले. त्यामुळे विजय मिळविणारच, अशी खात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना झाली होती. मतमोजणीच्या वेळी डॉ. कोल्हे यांचे मताधिक्‍य वाढू लागताच नेते आणि कार्यकर्ते यांनी एकमेकांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.

पुणे – तब्बल 15 वर्षे खासदार राहिलेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा विजयी चौकार रोखण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यंदाच्या निवडणुकीत यश आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा 58 हजार मतांनी पराभव करत त्यांना चितपट केले. डॉ. कोल्हे यांच्या या विजयामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जात असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिरकाव करून राष्ट्रवादीने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. आढळराव पाटील यांना 5 लाख 77 हजार 347 मते, तर राष्ट्रवादीचे कोल्हे यांना 6 लाख 35 हजार 830 मते
मिळाली आहेत.

आताचा शिरूर लोकसभा आणि त्यापूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र त्यावेळी उमेदवारी न मिळाल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत आढळराव यांनी अशोक मोहोळ यांचा पराभव केला. त्यानंतर आढळराव पाटील यांनी या मतदारसंघावर पकड मजबूत केली होती. हा मतदारसंघ जिंकायचाच अशा चंग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला होता.

यासाठी शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतून अभिनयाच्या माध्यमातून घरोघरी पोहचलेले डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. भाषणावर असलेले प्रभुत्व आणि सर्वच नेत्यांनी केलेले प्रयत्न यामुळे डॉ. कोल्हे यांनी अगदी पहिल्यापासूनच आढळराव पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना शिरूरमधील विजयाची खात्री झाली होती. त्याशिवाय 2014च्या लोकसभा निवडणुकीत तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्‍य घेतलेल्या आढळराव पाटील यांचे लिड तोडायचे कसे, याबद्दल व्यूहरचना आखण्यात आली होती. राष्ट्रवादीची ही व्यूहरचना चांगली यशस्वी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.