जबलपूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मध्यप्रदेशातील जबलपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये बोलताना विरोधकांवर चौफेर फटकेबाजी केली. देशभरामध्ये सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनांपासून ते जेएनयू, राममंदिर अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी विरोधकांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून राहुल गांधी, ममता बॅनर्जींना आव्हान
जबलपूर येथे आज भारतीय जनता पक्षातर्फे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ एका सभेचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शाह यांनी या कायद्याविरोधात तीव्र निदर्शने करणाऱ्या काँग्रेस व तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, मी राहुल गांधी व ममता बॅनर्जी यांना आव्हान देतो की त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यामध्ये कोणत्याही भारतीय नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतलं जाण्याबाबतची तरतूद शोधून दाखवावी.”
राम मंदिरावरून काँग्रेसवर निशाणा
राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्ला चढवताना गृहमंत्री म्हणाले, “काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल राम मंदिर बांधण्यास विरोध करतात मात्र तुम्ही कितीही जोर लावला तरी येत्या ४ महिन्यात राम मंदिर उभारण्यात येईल.”
जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांची जागा तुरुंगातच
जेएनयूमध्ये आंदोलनांदरम्यान देशविरोधी घोषणा दिल्या जात असल्याचा आरोप करत अमित शहा यांनी देशाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांची जागा ही तुरुंगामध्येच असल्याचं वक्तव्य केलं.
#WATCH Union Home Minister & BJP National President Amit Shah at a public meeting in Jabalpur: I challenge Mamata Banerjee and Rahul baba, to find out a provision from #CitizenshipAmendmentAct that can take citizenship away from anyone in this country. #MadhyaPradesh pic.twitter.com/vaxLPJqS0m
— ANI (@ANI) January 12, 2020