मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय राजकारणातील मोठं नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय कृषीमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलवल्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. शरद पवार यांच्याकडे पाहिलं की अनेकांना संघर्षाची प्रेरणा मिळते. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
दरम्यान, अश्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस असून सोशल मीडिया आणि फोनवरुन अनेकांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी सकाळी ट्विट करून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या होत्या. “मी शरद पवारांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते.