शेलपिंपळगाव येथील घटना
महाळुंगे इंगळे- रुग्णवाहिकेतून रुग्णांची ने-आण करण्याच्या इर्षेतून आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून 20 वर्षीय तरुणास शिवीगाळ, दमदाटी करीत जबर मारहाण करीत त्याचा खून केल्याप्रकरणी शनिवारी (दि. 21) रात्री तीन हल्लेखोरांना चाकण पोलिसांनी जेरबंद करण्यात आले. चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) गावच्या हद्दीतील अप्पाचा चहा या हॉटेल समोर शुक्रवारी (दि. 20) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
किशोर उर्फ साईनाथ नामदेव कुऱ्हाडे (वय 24, रा. मेदनकरवाडी, ता. खेड), नागेश विलास नाईकनवरे (वय 21, रा. आंबेठाण, ता. खेड) व संदेश उर्फ सुनील जाधव (वय 26, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) असे जेरबंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर अवधूत मोहन लांडगे (वय 20, सध्या रा. भोसे, ता. खेड, मूळ रा. कळंब, पो. ब्राह्मणवाडा, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. त्याचा भाऊ दत्तात्रय मोहन लांडगे (वय – 24 वर्षे, सध्या रा. भोसे) यांनी फिर्याद दिली होती. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.