जेजुरी- जनता कर्फ्यूला तीर्थक्षेत्र जेजुरी शहरात प्रतिसाद मिळाला. जेजुरी खंडोबा मंदिराचे प्रवेशद्वार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. गावातील प्रत्येक चौक व गल्ली बोळात शुकशुकाट असल्याचे दिसून आले. दरम्यान, जेजुरी पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होते. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करीत पालिका स्वच्छता विभाग प्रशासनाच्या वतीने कीटक व जंतूनाशक फवारणी केली जात आहे. श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त प्रमुख संदीप जगताप ट्रस्टी शिवराज झगडे, पंकज निकुडे हे रस्त्यावर उतरून फवारणी करीत होते.
नगरसेवक मेहूबूब पानसरे आणि उद्योजक देशपांडे यांनी व देवसंस्थान कमिटीने सतत बंदोबस्तात असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणावरील पोलिसांना अन्न, पाणीपुरवठा करण्यात आले. दरम्यान, वाल्हे येथे जनता कर्फ्यूला नागरिकांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी अभूतपूर्व शांतता होती. रस्त्यावर कोणी नाही हे पाहण्यासाठी आलेल्यांना पोलिसांनी समज दिली. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीवर आरोग्य विभाग आणि नागरिक लक्ष ठेवून आहेत. गर्दीने फुललेली वाल्हे गावातील बाजारपेठेमध्येही शुकशुकाट होता. सायंकाळी पाच वाजता करोना व्हायरसच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्वाप्रति वाल्हेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटासह थाळ्याच्या निनादात कृतज्ञता व्यक्त केली.
जनता कर्फ्यूला नीरा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खेडेगावातील लोकांनी ही रानामळात जाण्याचे टाळले. नीरा शहरासह पंचक्रोशीतील गावातील पेठांमध्ये शुकशुकाट होता. नीरेतील पंढरपूर रोड, बारामती रोड, नगर रोडसह शहरातील गल्ली बोळात ही निर्मनुष परिस्थिती दिसून आली. पोलिसांनी खडा पहारा ठेवला होता.
- कर्फ्यूनिमित्त शनिवारीच मांसाहाराची खरेदी
रविवारी होणाऱ्या जनता कर्फ्यूमुळे मांसाहारी पदार्थ रविवारी मिळणार नाहीत. त्यामुळे शनिवारीच नीरेतील हौशी खवय्यांनी मांसाहारी पदार्थ खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. आठवडे बाजारतळवरील मटण, मासे विक्रेत्यांच्या दुकानासमोर धुलवड किंवा गटारी अमावस्यासारखी गर्दी जमली होती. सायंकाळी पाच ते साडेसात यावेळेत शेकडो लोकांनी रविवारची खरेदी शनिवारीच उरकून घेतली.