पुणे – युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांचा पुनीत बालन स्टुडिओज आणि भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स यांनी “अमन का आशियॉं’ या खास गाण्याची निर्मिती केली आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे काश्मीर खोऱ्यातील युवा कलाकारांचा या गीत निर्मितीमध्ये सहभाग आहे.
पुनीत बालन यांचे भारतीय लष्कराशी काश्मीर खोऱ्यातील नातं 2020 मध्ये निर्माण झालं. पुनीत बालन यांनी उरी, वायने, हाजीनार, त्रेहगाम आणि बारामुल्ला येथील आर्मी गुडविल स्कूलसाठी आर्थिक मदत करण्यासाठी आणि दरवर्षी नवी शाळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याशिवाय करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी भारतीय लष्कराला 30 हून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सामाजिक मदत म्हणून भेट दिले. पुनीत बालन यांना त्यांच्या काश्मीर भेटीदरम्यान तेथील स्थानिकांशी झालेल्या संवादातून काश्मीरमध्ये संगीताविषयी असलेलं अपार प्रेम आणि तेथील गुणवान कलाकारांना संधी मिळत नसल्याचं जाणवलं. त्यातूनच काश्मिरी कलाकार आणि अन्य कलाकारांच्या सहभागातून गाण्याची निर्मिती करण्याची कल्पना पुढे आली.
काश्मीर खोऱ्यातील आतापर्यंत दुर्लक्षित कलावंतांना पुढे आणताना मला अतिशय आनंद होत आहे. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या प्रकल्पासाठी सहकार्य केले. त्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल देवेंद्र प्रताप पांडे यांनी पुनीत बालन स्टुडिओजला या गाण्याच्या निर्मितीसाठी शुभेच्छा दिल्या.
– पुनीत बालन, युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते