वालचंदनगर/कोरेगाव भीमा -सध्या ऑनलाइनच्या महाजालात तरूणाई गुरफटलेली दिसून येत आहे. त्यामाध्यमातून बनावट फेसबुक खात्याच्या माध्यमातून ऑनलाइन जाळ्यात ओढून गंडा घालण्याच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे तरूणाई मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणुकीला बळी पडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे याबाबत सावधान होण्याची गरज निर्माण झाली आहे.
ऑनलाइनच्या माध्यमातून विविध वस्तूंचे आमिष दाखवून फसवणूक सुरू आहे. बॅंक अधिकारी असल्याची बतावणी करून खात्यातून पैसे चोरण्याचा धंदाही तेजीत आहे. घरपोच सुविधेच्या नादात आज जवळपास प्रत्येकाने ऑनलाइन प्रणाली आत्मसात केली आहे. विविध ऑनलाइन ऍपवर ऑफरची भुरळ घातली जात आहे.
सर्व वस्तू ऑनलाइन मिळत असल्याने ग्राहकांचा या खरेदीकडे प्रचंड कल वाढला आहे. मात्र हीच प्रणाली फसवणुकीचे केंद्र ठरत आहे. आजवर घडलेल्या वेगवेगळ्या घटनेतून ही बाब अधोरेखित झाली आहे. शिवाय पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल होऊन काही प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत.
तसेच वस्तूंच्या फसवणुकी सोबतच आर्थिक लुबाडणुकीचे प्रकारही सातत्याने घडत आहेत. अनेकांना कधी सिमकार्ड नुतनीकरण तर कधी ऍप डाउनलोड करण्याचे सांगून हजारो रुपयांपर्यंतची रक्कम क्षणात खात्यातून चोरी गेल्या आहेत. कुणालाही एटीएमचा पासवर्ड अथवा त्यावरील क्रमांक सांगायचा नाही.
याबाबत बॅंकांनी ग्राहकांना सतर्क केले आहे. मात्र या घटनांना आळा बसला नसतानाच सायबर क्राइम मध्ये तरबेज झालेले चोरटे नवनवीन शक्कल लढवून लोकांची फसवणूक करीत आहेत. आता बनावट फेसबुक खाते तयार करून फसवणूक करण्यात येत आहे. ऑनलाइन माध्यमातून फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
सुरूवातीला फेसबुकवर मैत्रीचा संदेश या तरूणींकडून अल्पवयीन मुले, युवक तसेच विवाहितांना पाठविला जातो. त्यावर ऑनलाइनसाठी प्रोत्साहित करून व्हॉट्सऍप नंबर दिला जातो. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून उत्तेजित केले जाते.
त्यातूनच विवस्त्र केल्यानंतर व्डिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून पैशाची मागणी केली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. तर सायबर सेलकडून अशा प्रकरणाचा पर्दाफाश केला जावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पालकांचे दुर्लक्ष उठतंय मुळावर
ऑनलाइन शिक्षणासाठी पालक मुला-मुलींना महागडे मोबाइल घेऊन देत आहेत. परंतु पालकांचे दुर्लक्ष पाल्यांच्या मुळावर उठत असल्याचे दिसून येत आहे. बनावट फेसबुक खात्याद्वारे तरूणींकडून प्रथम फेसबुकवर मैत्रीचा संदेश अल्पवयीन मुले, युवक तसेच विवाहितांना पाठवला जातो.
त्यावर ऑनलाइनसाठी प्रोत्साहित करीत व्हॉट्स्ऍप नंबर देवून समोरच्या व्यक्तीचा नंबर प्राप्त करून घेतला जातो. त्यावेळी चॅटिंग दरम्यान व्हिडिओ कॉल करून थेट ऑनलाइनसाठी प्रोत्साहित केले जाते. या प्रकाराला अनेक नागरिक, अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. याबाबत पालक, नागरिकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.