अहवाल सादर करा : “कासारसाई’ प्रकल्प कालव्याच्या जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे – हिंजवडी आयटी पार्कला पर्यायी रस्ता देण्याबाबत कासारसाई धरण प्रकल्पाच्या कालव्याची एकूण जागा आणि अंदाजित खर्च याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.
हिंजवडी आयटी पार्कला पर्यायी रस्ता देण्यासाठी कासारसाई धरण प्रकल्पाच्या विनावापर कालव्याची जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करून तेथे रस्ता करण्याच्या प्रस्तावाबाबत नुकतीच जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. हिंजवडीपासून 17 किलोमीटर अंतरावर कासारसाई धरण आहे. कासारसाई प्रकल्पाचा कालवा 19 किलोमीटर लांबीचा आहे. सध्या या कालव्याचा वापर होत नाही.
या कालव्यासाठी जलसंपदा विभागाने काही जमीन संपादित केली आहे. ती जमीन बांधकाम खात्याला देऊन त्या ठिकाणी रस्ता करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली आहे.
हिंजवडी येथे दोन टप्प्यांत माहिती तंत्रज्ञान पार्क विकसित करण्यात आले. येथे सुमारे 68 हेक्टरवर विविध कंपन्या आहेत. याभागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पर्यायी रस्त्यांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या प्रकल्पाच्या कालव्याची 16 किलोमीटरची जागा जलसंपदा विभागाने संपादित केलेली आहे. उर्वरित तीन किलोमीटर जागेचे संपादन करणे आवश्यक आहे. तरच संपूर्ण कालव्याची जागा हस्तांतरण करण्यास अडचण येणार नाही. मात्र, आयटी पार्कमुळे याठिकाणी जमिनीचे भाव वाढले असल्याने तीन किलोमीटर जमीन संपादित करण्यासाठी सुमारे 70 ते 80 कोटींचा खर्च येणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर एक अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.