पिंपरी – पहिल्या टप्प्यात आकुर्डी व तळेगाव येथील रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात चिंचवड व देहूरोड रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे चे पुणे विभागाचे अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक ब्रिजेश सिह यांनी सांगितले.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी कार्यक्रम करण्यात आला. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आज आकुर्डी येथे पायाभरणी कार्यक्रम ऑनलीईन व्हिडीओ कॉन्फरन्स अंतर्गत करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरातील लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवासीयांच्या व शहरवासीयांच्या वतीने या वेळेला चिंचवड प्रवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
आकुर्डी येथे झालेल्या या कार्यक्रमास संघाचे पदाधिकारी मनोहर जेठवानी, मुकेश चूडासामा, गोविंदसिंग धावडा, सलीम शिकलगार, आर. एस. कुमार आदीच्या उपस्थितीत मध्य रेल्वेचे पुणे विभागाचे अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक ब्रिजेश सिह यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन आभारपर सत्कार करण्यात आला.
या वेळी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने पिंपरी रेल्वे स्थानक तसेच इतर दापोडी, कासारवाडी रेल्वे स्थानकाच्या समस्या तसेच आकुर्डी ते देहूरोड या दरम्यान जवळपास साडे पाच किलोमीटर अंतर आहे. रावेत परिसरात नागरी वस्ती वेगाने वाढत असून रावेत येथे नव्याने रेल्वे स्थानक उभारण्यात यावे. पुणे लोणावळा दरम्यान रेल्वेचे चौपदरीकरण करण्यात यावे आणि चिंचवड येथे एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा आदी समस्या मध्य रेल्वेचे पुणे विभागाचे अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक ब्रिजेश सिह यांच्याकडे मांडण्यात आल्या. त्यांनी चिंचवड प्रवासी संघाला भेटीचे निमंत्रण दिले आहे, असे मनोहर जेठवाणी यांनी सांगितले.