आघाडीतून स्वबळाकडे…

– विश्‍वास सरदेशमुख 

लोकसभेच्या मतदानाला काही आठवडेच शिल्लक राहिले आहेत. आयाराम-गयारामचे वाढलेले प्रस्थ, उमेदवारी जाहीर करणे, पक्षाचा अजेंडा यातच सध्या बहुतांश पक्ष अडकलेले असल्याने विरोधकांची सक्षम आघाडी अजूनही ठोसपणे समोर आलेली दिसत नाही. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अन्य पक्षातील नेत्यांना भेटावयास जाणारी मंडळी आता पक्षाबाहेर येण्यास तयार नाहीत. भाजपप्रणित आघाडी विरुद्ध कॉंग्रेसप्रणित आघाडी अशी सरळ लढत होईल, असा कयास बांधला जात होता आणि विरोधकांकडून तसे वातावरणही तयार झाले होते. मात्र आज राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. जेथे तिरंगी किंवा दुरंगीची अपेक्षा केली जात होती तेथे पाच-सहा प्रमुख पक्ष मैदानात उतरले आहेत. आघाडीच्या राजकारणात प्रथमच अनेक मोठे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष स्वबळावरच लढताना दिसून येत आहेत. सत्तेसाठी आघाडी करताना स्वत:चे महत्त्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.

विरोधकांचे ऐक्‍य घडवून आणण्यात पुढाकार घेणारे तेलंगणचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कोणत्याच आघाडीच्या भाग नाहीत. एक वेळ अशी होती की हे पक्ष कोणत्या ना कोणत्या आघाडीचे घटक होतील, असे वाटत हाते. राव यांनी तर म्हटले होते की, विरोधकांच्या ऐक्‍याच्या अभियानात ओडिशातील मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे सहकार्य घेऊ, मात्र पटनायक हे कोणत्यात आघाडीत सामील झालेले नाहीत. या तिघांपैकी आजच्या घडीला कोणीच आघाडीचा भाग नाहीत.

पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मदतीने महागठबंधनची मुहूर्तमेढ रोवणारे आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूदेखील कोणत्याच आघाडीत सामील झालेले नाहीत. दिल्लीत आम आदमी पक्ष देखील एकट्यानेच लढण्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे सर्वात विचित्र अवस्था समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बसपा नेत्या मायावती यांची झाली आहे. त्यांनी यूपीत आघाडी केली आहे. त्यांचे कॉंग्रेस आणि यूपीएशी काहीच देणेघेणे नाही. हे पक्ष परस्पर सहमतीनेच एकमेकांना जागा सोडत आहेत. उत्तर भारतातील पक्षांचा टीएमसी किंवा टीआरएसशी कोणताही संवाद आहे की नाही, हे कळायला मार्ग नाही. त्यांचा नॅशनल अजेंडा देखील काय आहे, हे कळत नाही. ते भाजपच्या विरोधात आहेत, मात्र केंद्रात कोणाचे सरकार होणार हे मात्र स्पष्ट झालेले नाही. त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, हे देखील स्पष्ट होऊ शकलेले नाही.

कॉंग्रेसने जम्मू-काश्‍मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, कर्नाटकमध्ये जेडीएस, तमिळनाडूत डीएमके, महाराष्ट्रात एनसीपी, झारखंडमध्ये जेएमएम आणि जेव्हीएम तसेच बिहारमध्ये आरजेडी आणि अन्य प्रादेशिक पक्षांशी आघाडी केली आहे. दुसरीकडे भाजपने आपल्या सर्वच जुन्या सहकारी पक्षांसमवेत यूपी, महाराष्ट्र, पंजाब आणि बिहारमध्ये आघाडी केली आहे. एकूणात आघाडीच्या राजकारणाचे वातावरण असताना सर्वच पक्ष स्वत:चे अस्तित्व आणि महत्त्व राखण्यासाठी धडपडत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.