- सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंतची वेळ
- दारुच्या दुकांनानाही मुभा
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज शहरातील रुग्णसंख्या दोनशेच्या खाली आली आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने लॉकडाऊनबाबत सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार शहरात १ जूनपासून अत्यावश्यक सेवांबरोबर दारु आणि इतर साहित्याची दुकानेही सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहेत. मात्र, दुपारनंतर पूर्ण संचारबंदी आणि पूर्ण वेळ निर्बंध लागू असल्याचे पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात दुसऱ्या लाट आल्यानंतर कडक निर्बध लागू करण्यात आले होते. मे महिन्याच्या मध्यापासून शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्यी कमी होऊ लागली आहे. विविध जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पॉझिटिव्हिटी रेट विचारात घेऊन महापालिका पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्याहून कमी असल्यास पालिका आयुक्तांच्या अधिकारात निर्बंध उठवण्याबाबत निर्णय घेणे सोयीचे झाले आहे. महापालिकेचा पॉझिटिव्हीटी रेट सोमवारी (दि.31) 5 टक्के इतका आहे. तर गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट 8 टक्के इतका होता. त्या नुसार पिंपरी महापालिका आयक्त राजेश पाटील यांनी सुधारित आदेश काढले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात आता सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत दुकाने उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजी, दूध, बेकरी, चिकन, मटण, कृषी, पावसाळी साहित्य, चष्म्याची दुकानांसह आता इतर साहित्याची दुकानेही उघडता येणार आहेत. तर, दारु विक्रीला देखील नवीन आदेशात परवानगी मिळाली आहे. दुपारी तीननंतर संचारबंदी लागू राहील. तसेच, करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कायम राहणार आहेत. शहरात पीएमपीएमएल बससेवा, उद्याने, जिम, स्पा बंद राहणार आहे. नागरिकांनी आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत लागू केलेले आदेश हे पुढील 10 दिवस लागू राहलीत. त्यानंतर करोना पॉझिटिव्हीटी रेटचा आढावा घेऊन सुधारित आदेश दिले जातील. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निर्बंधाबाबत वेळोवेळी फेरविचार केला जाईल. तसेच, करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
– राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका