- रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्णय
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे ऍटो क्लस्टर रुग्णालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश काढले आहेत.
शहरातील रुग्णसंख्या कमी झाल्याने पाच कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहे. तर नेहरुनगर येथील जम्बो रुग्णालयातही नवीन रुग्णांना प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. आता पालिकेने करोनासाठी तयार केलेले ऍटो क्लस्टर रुग्णालय बंद करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऍटो क्लस्टर येथे सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली होती. करोनाची लागण झालेल्या एकाही रुग्णाला आज ऍटो क्लस्टर रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. तसेच याठिकाणी उपचारासाठी एकही रुग्ण नाही. त्यामुळे रुग्णालय बंद करण्यात यावे. तसेच येथील सेवा अधिग्रहित केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहे.