महापालिकेचा निर्णय : 15 पथकांची स्थापना
पुणे – शहरातील करोनाच्या रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी तसेच करोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महापालिका शहरातील ज्येष्ठ नागरिक निवासस्थाने, निवारा केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या धर्तीवर 15 पथके तयार केली आहेत. सोमवारपासून ही तपासणी मोहीम सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली
जगभरात करोनाच्या साथीने थैमान घातले आहे. पुण्यात या साथीची लागण झालेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असली तरी, त्यात सर्वाधिक रुग्ण हे वयवर्षे 40च्या पुढील आहेत. याशिवाय, देशभरात तसेच जगभरात या आजाराची लागण झालेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्या ज्येष्ठ नागरिकांची आहे.
त्यामुळे या साथीचा शहरातील प्रतिबंध रोखण्यासाठी महापालिकेकडून आता प्रभागनिहाय प्रत्येक घरात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच ज्येष्ठांच्या निवारा केंद्रातील नागरिकांचीही तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी आवश्यक साहित्य तसेच औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यानुसार, संबंधित नागरिकांना तपासण्यात आल्यानंतर त्यांना आवश्यकता भासल्यास पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले जाणार असून गरज भासल्यास 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे.