पुणे – गुरू हॉकी अकादमी हरियाणा, आर. के. रॉय अकादमी पटणा, एसजीपीसी अमृतसर, हॉकी अकादमी सोनीपत या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा मोठ्या गोल फरकाने पराभव करून 5 व्या एसएनबीपी अखिल भारतीय 16 वर्षांखालील मुलांची हॉकी स्पर्धेत विजय नोंदविला.
पटणाच्या आर. के. रॉय अकादमी संघाने एफ गटात दोन्ही लढती जिंकून 6 गुणांसह बाद फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या लढतींमध्ये एकूण 44 गोल नोंदविले गेले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हॉकी मैदानावर एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने असलेल्या या स्पर्धेत एफ गटात पटणाच्या आर. के. रॉय अकादमीने पश्चिम बंगालच्या बेलकुलाई सीकेएसी विद्यापीठ संघाचा 7-0 गोलने पराभव केला.
ब गटाच्या झालेल्या लढतीत हरियाणाच्या गुरू हॉकी अकादमीने तेलंगनाच्या मदर टेरेसा हायस्कूल संघाचा 17- 0 गालने धुव्वा उडविला. सोनीपतच्या हरियाणा हॉकी अकादमीने ए गटात रायपूरच्या स्मार्ट हॉकी अकादमीला 14-0 गोलने नमविले.