नांदूरच्या आजींची शिवरायांच्या जन्मस्थळी भेट देण्याची इच्छा पूर्ण
मंचर – संसाराच्या रहाटगाडग्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनमस्थळला भेट देण्याची इच्छा अखेर वयाच्या ८२ व्या वर्षी पूर्ण झाली. आश्चर्य वाटलं ना… पण खर आहे. नांदुर (ता. आंबेगाव) येथील एका ८२ वर्षीय आजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेला किल्ले शिवनेरी सर केला आहे आणि या किल्ल्यावर येण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली.
पार्वताबाई मुरलीधर वायाळ (वय ८२) या आजी नांदूर येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. एवढी वर्षे येथे राहूनही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म स्थळाला भेट देण्याची इच्छा पूणर करता आली नव्हती. कामाच्या आणि संसाराच्या रहाटगाडग्यात तिथपर्यंत जाता येत नव्हते. मात्र, त्यांचा मुलगा हरिभाऊ वायाळ यांनी त्यांची ही इच्छा वयाच्या ८२ व्या वर्षी पूर्ण केली आहे.
याबाबत पार्वताबाई वायाळ यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला मी स्वतः चढून पार केला. त्यामुळे मला खूप समाधान वाटले. किल्ला सर करताना माझ्यात एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली होती. यावेळी हरिभाऊ वायाळ यांनी सांगितले की, माझ्या आईने यापूर्वी कधीही शिवनेरी किल्ला पाहिला नव्हता. मात्र, तिची इच्छा तिने माझ्याकडे व्यक्त केली आणि तिला मी शिवनेरी किल्ल्यावर घेऊन आलो. तिने स्वतः शिवनेरी किल्ल्याच्या पायऱ्या चढल्या आहेत. तिच्या चेहऱ्यावर एक ऊर्जा पाहायला मिळाली.
पार्वताबाई यांनी या वयात शिवनेरी किल्ला चढल्याचा उत्साह तरुणांना देखील लाजवणारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नुसते कानावर जरी आले तरी अंगात उत्साह संचारतो. तोच उत्साह पार्वताबाई यांच्या अंगात संचारल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या कार्याला नक्कीच सलाम.
– शेखर चिखले उपसरपंच, नांदूर