नवी दिल्ली -आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने शुक्रवारी संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल केले. त्यानुसार, दिल्लीच्या माजी आमदार अलका लांबा यांना महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा बनवण्यात आले. तर, पक्षाची विद्यार्थी शाखा असणाऱ्या नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडियाच्या (एनएसयूआय) अध्यक्षपदी वरूण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली.
नेट्टा डिसुझा यांच्या जागी लांबा यांची नियुक्ती करण्यात आली. विद्यार्थी दशेपासून लांबा राजकारणात सक्रिय झाल्या. त्या १९९५ मध्ये एनएसयुआयच्या उमेदवार म्हणून दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून गेल्या.
त्यांनी २०१४ मध्ये कॉंग्रेसला रामराम ठोकून आपमध्ये प्रवेश केला. पुढच्याच वर्षी त्या आपच्या आमदार बनल्या. नंतर २०१९ मध्ये त्या कॉंग्रेसमध्ये परतल्या. मागील वर्षी त्यांना कॉंग्रेस कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून स्थान मिळाले.
आता पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विद्यार्थी शाखेतही खांदेपालट करताना कॉंग्रेसने नीरज कुंदन यांच्या जागी चौधरी यांची नियुक्ती केली.