बारामती – बोईंग व एअर बस यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या विमानांचे वायरिंग तयार करणाऱ्या जी.के.एन. एरोस्पेस चाकण, पुणे या कंपनीत विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील २९ मुलींना संधी मिळाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.
या कंपनीत मुली अष्टपैलू असतात व त्यांचेवर सोपवलेली जबाबदारी त्या उत्तम पद्धतीने पार पाडतात, असे गौरवोद्गार कंपनीचे अधिकारी नगरकर यांनी या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी काढले. या कंपनीमध्ये तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील एकूण १२६ विद्यार्थीनींनी नाव नोंदविले होते. त्यांच्या मुलाखती घेण्याकरिता जी.के.एन. एरोस्पेस चाकण कंपनीच्या एकूण चार सदस्यांनी महाविद्यालयास भेट दिली. प्लेसमेंट ड्राईव्हची सुरुवात “प्री- प्लेसमेंट टॉक” ने झाली. या मध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कंपनी बाबत विद्यार्थीनीना अवगत केले. तसेच कंपनीच्या कामाचे स्वरूपही थोडक्यात स्पष्ट केले.
या कंपनीच्या “अप्रेनटीस” या पदांकरिता घेण्यात आलेल्या मुलाखतीसाठी एकूण १२६ विद्यार्थीनींनी नाव नोंदणी केली. पहिल्या फेरीत लेखी परीक्षे मार्फत एकूण ५५ विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये मुलींच्या स्कील टेस्ट करून, आणि वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या व त्यामधून शेवटी एकूण २९ विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थिनींना उत्तम वार्षिक पॅकेज मिळणार असून कंपनी तर्फे वाहतूकीची व जेवणाची मोफत सोय होणार आहे. एक वर्षाची अप्रेनटीस पूर्ण केल्यानंतर कंपनी मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थिनीं विज्ञान शाखेतील अंतिम वर्षात शिक्षण घेत असून जून महिन्यापासून त्यांना या कंपनीत रुजू व्हावे लागेल.
हा प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी प्लेसमेंट अधिकारी डॉ. विशाल कोरे, महाविद्यालयीन प्लेसमेंट समितीचे समन्वयक गजानन जोशी, गौतम कुदळे किशोर ढाणे, सारिका खेत्रे, प्रियांका साळुंखे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त सुनेत्रा पवार, खजिनदार युगेन्द्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, डॉ.लालासाहेब काशीद, आय.क़्यु.ए.सी. समन्वयक प्रो. निलीमा पेंढारकर, आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन करून त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.