न्यूयॉर्क – संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेवर मंगळवारी अल्जेरिया, गयाना, सिएरा लिओन, स्लोव्हेनिया आणि दक्षिण कोरिया या पाच देशांची निवड करण्यात आली. या देशांच्या सदस्यत्वाची मुदत पुढील वर्षी 1 जानेवारीपासून 2 वर्षांसाठी असणार आहे.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77 व्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी सुरक्षा परिषदेवर निवड झाल्याबद्दल या सर्व देशांचे अभिनंदन केले आहे. सुरक्षा परिषदेवर ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे पाच स्थायी सदस्य आहेत. या देशांना नकाराधिकार प्राप्त आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे असताना या सुरक्षा परिषदेमध्ये अधिक कायम सदस्यत्व असलेल्या आणि अस्थायी सदस्यत्व असलेल्या देशांचा समावेश करण्याचा आग्रह भारताने धरला होता.
सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या रचनेमध्ये वास्तवाचे कोणतेच प्रतिबिंब दिसत नसल्याने या परिषदेमध्ये तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायम प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी अलिकडेच केले होते.