नगर -लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद असली, तरी छुप्या मार्गाने दारू विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आला. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात चक्क रुग्णवाहिकेमधून दारूची विक्री होत असल्याचा प्रकार पोलिसांनी चव्हाट्यावर आणला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 180 मिलीच्या 79 दारूच्या बाटल्यांसह रुग्णवाहिका, असा दोन लाख 70 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आज दुपारी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरात छापा टाकला.
या मोटारसायकलवरील दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. वीरू प्रकाश गोहेर व रॉबिन जॉर्ज कोरेरा (दोघे रा. सिव्हिल क्वॉटर) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विश्वासात घेवून दारू कोठून आणली, याबाबत माहिती घेतली. त्यावेळी या दोघांनी एका रुग्णवाहिकेतून दारू विकत मिळाली असल्याचे सांगितले. त्या रुग्णवाहिकेत आणखी दारूचे बॉक्स असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात ती रुग्णवाहिका शोधून काढली. संजय गंगाराम हंकारे (रा. कृष्णाई बंगला, उदय हाऊसिंग सोसायटी, रासनेनगर) याला ताब्यात घेवून त्याच्या रुग्णवाहिकेची (क्र. एमएच-14 ईवाय- 1365) झडती घेतल्यानंतर त्यात विदेशी दारूच्या 180 मिलीच्या 79 बाटल्या आढळल्या.