पुणे – बी. जे. मेडिकल कॉलेजप्रमाणे राज्यातील आणखी सात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत करोनाची चाचणी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये बारामती, कोल्हापूर, नांदेडसह सात मेडिकल कॉलेजमध्ये या सुविधा येत्या 10 मेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे त्या त्या भागातील रुग्णांच्या चाचणीचे आता तत्काळ निदान करणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यात आणखी 7 प्रयोगशाळांची भर पडली असून 50 प्रयोगशाळांमधून सुविधा दिल्या जाणार आहेत.
राज्यात करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) चाचण्यासाठी नमुने पाठविले जात होते. संसर्ग वाढल्यानंतर राज्य सरकारने विविध ठिकाणी प्रयोगशाळा कार्यान्वित केल्या. राज्यात आतापर्यंत पुण्यात बी. जे. मेडिकल कॉलेज, मुंबई, लातूर, मिरज, सोलापूर, धुळे, अकोला, औरंगाबाद, तसेच नागपूर येथील दोन सरकारी मेडिकल कॉलेज आणि आंबाजोगाई अशा 18 ठिकाणी टप्प्याटप्प्याने प्रयोगशाळा कार्यान्वित केल्या. त्याशिवाय अन्य सरकारी प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांच्या रुग्णांच्या चाचण्या करण्याचा वेग वाढू लागला. त्यामुळे वेगाने निदान होणाऱ्यांची संख्या वाढू लागली.
परिणामी, राज्यात एकट्या एनआयव्ही येणारा ताण कमी करण्यासाठी अन्य प्रयोगशाळांची मदत झाली. तसेच राज्यात खासगी प्रयोगशाळांनादेखील मान्यता देण्यात आली. आता बारामती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, नांदेड येथील सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रयोगशाळा सुविधा सुरू होणार आहे. ही सुविधा 10 मे च्या सुमारास सुरू होईल, असे वैद्यकीय शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.