रिक्षाचालक महादेव पाखरे यांचा अभिनव उपक्रम : 15 ऑगस्टपासून प्रारंभ
आळंदी – आळंदी येथील रिक्षाचालक महादेव पाखरे यांनी अवघ्या 351 रुपयांत रिक्षातून संपूर्ण आळंदी दर्शन ही योजना सुरू केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या योजनेचा शुभारंभ होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले तीर्थक्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. माऊलींच्या दर्शनासाठी येथे राज्यभरातून भाविकांची रिघ असते. एकादशी, रविवार तसेच इतर दिवशीही मोठ्या संख्येने भाविक आळंदीला भेट देतात. आळंदी हे ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे येथे माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरासह इतरही देव देवता तसेच माऊलींशी संबंधित इतर धार्मिक ठिकाणे आहेत.
भाविकांना मंदिरांची माहिती नसते. तर ज्यांना माहिती असते त्यांना पायपीट करत त्या मंदिरांना भेटी द्याव्या लागतात. आता आळंदी दर्शनच्या माध्यमातून भाविकांना ही सोय होणार आहे. 351 रुपयांमध्ये रिक्षातून तीन किंवा चार जणांना आळंदी दर्शनाचा लाभ मिळणार आहे. भाविकांना महादेव पाखरे हे गाइडदेखील (माहिती) करणार आहे.
आवश्यकता भासल्यास अल्पदरात चहा, नाश्ता आणि जेवणाची देखील सोय करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पाखरे हे 2019 पासून मानवतेच्या भावनेतून अंध, अपंगांना मोफत तर विद्यार्थ्यांना आणि 70 वर्षांवरील वयोवृद्धांना 49 टक्के सवलतीत रिक्षासेवा पुरवत आहेत.
दर्शनमध्ये काय पाहाल?
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे मुख्य मंदिर (संजीवन समाधी मंदिर), माऊलींनी चालविलेली भिंत, विश्रांतीवड (चांगदेव महाराज भेट), ग्रामदैवत हजेरी मारूती मंदिर, भैरवनाथ मंदिर, संतोषीमाता मंदिर (जलाराम बप्पा), महालक्ष्मी (शितळा देवी) मंदिर, ज्ञानेश्वरी मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे राहते घर असलेली भूमी सिद्धबेट, श्री गजानन महाराज मंदिर.