मुंबई – बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि अभिनेता इमरान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा सिनेमा फेब्रुवारी महिन्यात सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. त्यामुळे ओटीटीवर हा सिनेमा आपली कमाल दाखवण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहावे लागणार आहे.
अक्षय कुमार आणि इमरान हाशमीचा ‘सेल्फी’ हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारने एक खास पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसले आहेत.
या सिनेमात अक्षय कुमार सुपरस्टार विजय कुमारच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाशमीने त्याच्या चाहत्याची भूमिका साकारली आहे. इमरान हाश्मी हा आरटीओ ऑफिसर असून तो अडचणीत सापडलेल्या अक्षय कुमारची म्हणजेच विजय कुमारची कशी मदत करतो याचा गंमतीशीर प्रवास सिनेमात दाखवण्यात आला आहे. एक सेल्फी मिळवण्यासाठी वेड्या झालेल्या एका चाहत्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. राज मेहताने या सिनेमात दिग्दर्शन केलं असून करण जौहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे.