मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर काही बोलण्यापेक्षा या आरक्षणाच्या दिरंगाईबद्दल राज्य सरकारला प्रश्न विचारायला हवा होता असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे यांनी केले आहे.
जरांगे सध्या मुंबईच्या वाटेवर असून या मोर्चाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी जरांगे अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी राज्य सरकारला धारेवर धरायला हवे होते. आरक्षण देण्यास विलंब का झाला, असा सवाल त्यांनी करायला हवा होता. मात्र त्याऐवजी ते या विषयाच्या विरोधात बोलत आहेत,असा आरोप त्यांनी केला.
जरांगे म्हणाले की, राज्य सरकारने त्यांच्या रॅलींविरोधात बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केल्यास “गंभीर परिणाम” होतील. ते म्हणाले की, हे आंदोलन यापुढे संपुष्टात आणता येणार नाही. आमच्या मागण्यांसाठी मोर्चे काढणे आणि आंदोलन करणे हे लोकशाहीच्या चौकटीत येते. मी मुंबईत धरणे आंदोलन करण्याची परवानगीही मागितली आहे,असे ते म्हणाले. आपल्या मागण्यांच्या संबंधात राज्य सरकारच्या प्रतिनिधींशी आपण चर्चा करण्यास तयार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकारने मात्र आता अधिक जागरूक झालेल्या मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
सोमवारी त्यांचा मोर्चा पुणे जिल्ह्यातील सुपा शहरात पोहोचणार आहे, जिथे त्यांचा रात्री मुक्काम असेल. अंतरवली सराटी गाव ते मुंबई हे अंतर ४०० किमीपेक्षा जास्त आहे.मुंबईत पोहचल्यानंतर ते तेथे २६ जानेवारीपासून बेमुदत उपोेषण सुरू करणार आहेत.