पुणे – “हडपसर महापालिकेबद्दल कार्यकर्त्यांमध्येही चर्चा आहे. परंतु निवडणुका जवळ आल्या आहेत. कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे हा निर्णय आता होईल, असे वाटत नाही,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
हडपसरला नवीन पालिकेला स्थापनेबाबत विचारले असता पवार यांनी ही माहिती दिली. पुणे महापालिकेमध्ये नव्याने 23 गावे समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेची हद्द विस्तारली असून नवी पालिका स्थापनेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, प्रभाग रचनेविषयी विचारले असता पवार म्हणाले की, “मुंबईमध्ये एकचा प्रभाग करण्याचा निर्णय झालेला आहे.
मात्र, आगामी निवडणुकीसाठी पुण्यामध्ये प्रभाग एकचा करायचा, दोनचा की तीनचा यावर निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीतील सर्व नेते एकत्रितपणे याचा निर्णय घेऊ.’
…तर बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सोडवला असता
बैलगाडा शर्यतीचा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारित असता, तर तो सोडवला असता, असे सांगत पवार म्हणाले, “राज्यपालांबरोबरच कालच भेट झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी स्वत: होतो. बारा आमदारांबाबत चर्चा झाली, त्यांनी पुढील आठवड्यात बोलविले आहे,’ असेही ते म्हणाले.
राज यांच्या बोलण्याला अर्थ नाही
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेबद्दल बोलताना पवार म्हणाले, राज ठाकरे यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही सर्व पुरोगामी विचारांचे आहोत. सर्वधर्मसमभावाची आमची भूमिका आहे. मात्र, काही लोक काही बोलतात. त्याला आम्ही फार महत्त्व देत नाही.