बारामती -माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी पणदरे येथील मंगेश प्रताप जगताप व गुणवडी येथील ऍड. वसंत गावडे यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीवेळी दिलेला शब्द उपमुख्यमंत्री यांनी पाळला असल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या वतीने काही जणांना उमेदवारी देणे शक्य झाले नाही अशांना स्वीकृत संचालकपदी संधी देऊ, असे मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते, त्यानुसार पणदरे येथील मंगेश जगताप यांना पाच वर्षाकरिता स्वीकृत संचालक म्हणून संधी देण्यात आली आहे.
तर गुणवडी गटातून राष्ट्रवादीच्या निळकंठेश्वर पॅनेलमधून ऍड. वसंत गावडे यांना उमेदवारी देण्यात आली होती; मात्र अटीतटीच्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अजित पवार यांच्या सूचनेनुसार गावडे यांना एक वर्षाकरिता स्वीकृत संचालकपदी संधी मिळाली आहे.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर तसेच बारामती सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दोन्ही स्वीकृत संचालकांची नावे जाहीर केली. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्षपदी तानाजी कोकरे यांनी मान्यता दिली.