कराड -किरपे-येणपे रस्त्यावर मंगळवारी (दि. 16) रात्री बिबट्याचे एक पिल्लू वाहनाच्या धडकेत जखमी झाले. ते सुमारे अर्धा तास रस्त्यावर जखमी अवस्थेत पडून होते; परंतु त्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागल्याने ते पिल्लू नदीकडेला असलेल्या शेतात घुसले. ही माहिमी मिळाल्यानंतर वन विभागाकडून मंगळवारी रात्रीपासून शोधमोहीम सुरू होती. मात्र, त्यात अपशय आले.
किरपे, येणपे भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. बिबट्याचे पिल्लू मंगळवारी रात्री रस्त्यावर आले होते. एका वाहनाच्या धडकेत ते जखमी झाले. ते रस्त्यावर पडून असल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गर्दी वाढल्याने जखमी अवस्थेतील ते पिल्लू तेथून नदीच्या बाजूस असलेल्या शेतात घुसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल झाले.
जखमी असल्याने बिबट्याचे पिल्लू फार लांब जाणार नाही, अशी शक्यता त्यांना वाटत होती. या भागास ऊस शेती मोठ्या प्रमाणात असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. ही शोधमोहीम बुधवारी दिवसभर सुरू होती. त्यांना येणपे येथील युवकांनी सहकार्य केले; परंतु त्या पिल्लाचा शोध घेण्यात वन विभागाला अपयश आले.