Ajit Pawar Group – आमदार अपात्रतेच्या मुद्यावरून सुरु असलेल्या सुनावणीत आपले म्हणणे मांडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Group) यांच्या नेतृत्वाखालील गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे एक महिन्याची मुदत मागितली आहे.
आमदार अपात्रतेच्या मुद्यावरील परस्परविरोधी याचिकांच्या संदर्भात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांतील 51 आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर अध्यक्षांना 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करायची असल्याने आता यावर अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागणार आहे.
पक्षशिस्त मोडल्याने अजित पवार गटाच्या आमदारांवर कारवाई करून त्यांना अपात्र ठरवा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अजित पवार गटाकडूनही शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात अजित पवार गटाने आपले म्हणणे मांडण्यासाठी 1 महिन्यांची मुदत मागितली आहे. शिवसेनेबाबत विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय द्यायचा आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया हिवाळी अधिवेशन काळातच सुरू केली जाणार आहे.
राष्ट्रवादीची सुनावणी संपवून 31 जानेवारी 2024 पर्यंत अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. मुदतवाढ दिल्यास सुनावणीसाठी कमी कालावधी मिळणार असल्याने विधानसभा अध्यक्ष कोणता निर्णय घेतात याकडे राष्ट्रवादीच्या आमदारांचे लक्ष आहे.