मुंबई – देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल तर शतक पूर्ण करण्याच्या समीप आहे. केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेल्या दरवाढीविरोधात शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आज आंदोलन करण्यात आले. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी केली. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच दरवाढीवरून फटकारल्याचे पहायला मिळाले.
राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करावेत आणि इंधन भाववाढ नियंत्रणात आणावी, असं म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. आधी केंद्र सरकारला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगा, अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं.
इंधन दरवाढीवरून शिवसेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे कर कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी. मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो, त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी झाले होते. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवावेत.’असे फडणवीस यांनी सांगितले होते.
दरम्यान पेट्रोल आणि डिझेलवर राज्याच्या करापेक्षा केंद्राचा कर जास्त आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगावे, अशा असा प्रतिटोला अजित पवार यांनी फडणवीस यांना लगावला.