सातारा -राज्यातील काही पोलीस अधीक्षकांच्या बदल्या गृह विभागाने केल्या आहेत. सातारच्या पोलीस अधीक्षकपदी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी क्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली करण्यात आली आहे.
तेजस्वी सातपुते यांची फेबुवारी 2019 मध्ये साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती. जिल्ह्याचा क्राइम रेट कमी करण्यात त्यांना यश आले होते. जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी त्यांनी अनेक टोळ्यांवर “मोक्का’ अंतर्गत कारवाया केल्या. करोना संक्रमणाच्या सात महिन्यांच्या काळात त्यांनी जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था अबाधित राखली. त्यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेने 95 टक्के गुन्हे उघडकीस आणले.
“करोना योद्धे’ म्हणून जनतेच्या रक्षणासाठी अविश्रांत कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी सातपुते यांच्या प्रयत्नांमधून उभारलेल्या कोविड केअर सेंटरची दखल गृह मंत्रालयाने घेतली. सातारचे नवे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल हे मूळचे उदयपूर (राजस्थान) येथील रहिवासी असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा तीन वेळा उत्तीर्ण होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 2012 मध्ये 524 व्या रॅंकने उत्तीर्ण झालेल्या बन्सल यांची सुरुवातीला कस्टम विभागाच्या सहाय्यक उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. 2013 मध्ये पुन्हा 178 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर अजयकुमार यांनी भारतीय पोलीस सेवेत महाराष्ट्र केडरला पसंती दिली.
अजयकुमार यांनी रूरकी आयआटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे बंधू अतुलकुमार हे अंतराळ संशोधक, एक बहीण मोनिक नेत्रशल्य विशारद असून दुसरी बहीण रितू प्राध्यापक आहेत. बन्सल यांची पहिली नियुक्ती ऑगस्ट 2019 मध्ये त्यांचे गडचिरोतील अहेरी उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी झाली होती. तेथे त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवया केल्या. ते लवकरच सातारा पोलीस दलाची सूत्रे स्वीकारतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.