पाथर्डी – चितळवाडी शिवारात दोघांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल व रोख रकमेसह ऑनलाईन रक्कम असा २३ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला. दोघांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी चितळवाडी येथील सोनू लहानू गायके व सागर विष्णू चितळे यांना अटक केली आहे.
चितळवाडी शिवारात दि. ५ रोजी रात्री अकरा वाजता ही घटना घडली. मुकुंद मारुती तानवडे व त्यांचा मित्र सीताराम घोरतळे हे दोघेजण बारामतीवरून काम करून पिंगेवाडी येथे मोटरसायकलवरून जात होते. रात्री अकराच्या सुमारास चितळवाडी बसस्थानकाजवळ तानवडे आले असता तेथे दोघेजण आले. त्यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून तानवडे व घोरतळे यांच्याकडून ३ हजार ९०० रुपये रोख, १६ हजारांचा मोबाईल व गुगल-पेवरून ३ हजार ८०० रुपये असा २३ हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला. त्याच दरम्यान तानवडे यांनी पोलिसांना फोन केला होता.
पोलिसांचा पुन्हा फोन आल्याने त्याचा राग येऊन तानवडे व घोरतळे यांना चोरट्यांनी मारहाण केली. पोलिसांनी तातडीने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला. सोनू लहानू गायके व सागर विष्णू चितळे (दोन्ही रा. चितळवाडी, ता. पाथर्डी) यांना अटक केली आहे.