शेवगाव – सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीवरून शिर्डी येथे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने पंतप्रधानाच्या सभेसाठी तालुक्याच्या गावागावात पाठविण्यात आलेल्या एसटी बसेस आंदोलकांच्या रेट्यामुळे रिकाम्याच परतण्याची वेळ आली.
येथील हसनापूर, कोळगाव, मंगरूळ, अंतरवाली, ढोरजळगाव आदी गावांत पाठविलेल्या बसमध्ये एकही व्यक्ती न बसल्याने रिकाम्याच परतल्या. या बसेस नियोजित गावात जाऊन थांबल्या. मात्र, त्यामध्ये दोन संयोजक कर्मचाऱ्यांशिवाय कोणी ग्रामस्थ बसला नाही. उलट पक्षी गावातील कोण बसमध्ये चढतो का याची टेहळणी करणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती.
शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून काही जणांसह शिर्डीकडे निघालेल्या काही बसेस भातकुडगाव फाट्यावर आंदोलकांनी अडवल्याने पुन्हा त्या गावी परत पाठविण्यात आल्या. सुमारे 40 एसटी बसगाड्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात लावल्या.
शिर्डीला जाण्यासाठी शेवगाव आगारात गेवराई येथून 20, तसेच धारूर व माजलगाव आगारातून प्रत्येकी 18 अशा एकूण 56 एसटी बसेस आल्या होत्या. त्या तालुक्याच्या ग्रामीण भागात बुधवारी रात्रीच पाठविण्यात आल्या. मात्र, गावागावात सकल मराठा समाज व त्यांना पाठिंबा देणारे रस्त्यावर उतरून आक्रमक झाले. या जमावाने त्या एसटी बसेस शांततेच्या मार्गाने अडवल्या. या वेळी सभेस जाणाऱ्या इच्छुकांनीदेखील कोणताही विरोध न करता उतरून घेतले. मात्र, तालुक्यातील मंगरूळ येथे एसटी बसच्या (एमएच 14 बीटी 2158) मागील बाजूची काच जमावाने फोडल्याची घटना घडली. काही ठिकाणी बसवर चिकटविलेले सभेचे पोस्टर फाडून आपला संताप व्यक्त केला.
अवैध प्रवासी वाहनचालकांची चांदी..!
पंतप्रधानांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमविण्याचे प्रशासनाचे नियोजन असल्याने काल (बुधवार) दुपारपासूनच एसटी बसेस रिकाम्याच आपापल्या नियोजित गावाकडे धावू लागल्या. त्यामुळे शेवगाव आगाराचे रोजचे वेळापत्रक बिघडले. कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामीण भागात फेऱ्या मारणाऱ्या गाड्या ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, तालुक्याच्या ठिकाणी शेवगावी नोकरी-धंद्यांनिमित्त रोज एसटी बसने ये-जा करणाऱ्या हजारो पासधारकांसह स्त्री-पुरुष, वृद्ध प्रवाशांचे मोठे हाल झाले. अवैध प्रवासी वाहनचालकांनी मात्र ही पर्वणी कॅश केली. रात्री उशिरापर्यंत तिप्पट-चौपटीने भाडे मोजून अडलेल्या प्रवाशांना घर जवळ करावे लागले. याबद्दल सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त होत होती.