शेवगाव – फटाक्यांची आतषबाजी, नवीन कपड्यांची खरेदी, गोडधोड पदार्थांचा फराळ, आकाश-कंदील आणि घरादारावर सजणाऱ्या पणत्यांचा दीपोत्सव, तसेच भाऊबीजेनिमित्त बहिणींना भावाकडून मिळणारी माहेरची साडी अशा विविध संस्कृतीची देवाण-घेवाण केला जाणारा हा सण. मात्र, कित्येक जण कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी ऊसतोड कामगार, वीटभट्टी, कामगार म्हणून सातत्याने स्थलांतर करतात. जिथे राहण्याचाच ठिकाणा नाही, तिथे या कुटुंबांना कसली आली दिवाळी वा दीपोत्सव. पाचटाच्या कोपीत रहायचे आणि अर्ध्या रात्रीच उठून थंडी गाऱ्याचे आपल्या छोट्या-छोट्या लेकरांसह उसाचा फड गाठायचा. अशा धावपळीत दिवाळी त्यांच्या ध्यानी मनी नसते.
स्नेहालय व डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व इनरव्हील क्लब, रोटरी क्लब, गोविंदा ग्रुप, जागर आदी ग्रुपसह संवेदनशील देणगीदारांच्या सहयोगातून या वर्षी उचल फाउंडेशनची ही दिवाळी गंगामाई साखर कारखान्यावरील घोटण गाडीतळावर साजरी करण्यात आली.
या वेळी महिलांना डॉ. मनीषा लड्डा यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. राजश्री रसाळ यांनी मुलांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. या वेळी वसुधा सावरकर, मीनाक्षी शिंदे, काजल बिडकर, अस्मिता बिडकर, उपनिरीक्षक सुनील बिडकर, अशोक बिडकर उपस्थित होते. या वेळी ऊसतोडणी कामगार कुटुंबातील 50 महिलांना साडी, पुरुषांना कपडे, तसेच सर्वांना दिवाळी फराळ देण्यात आला. तसेच त्यांच्या तीन मुली व एक मुलाचे शैक्षणिक पालकत्वही फाउंडेशनने स्वीकारले. ऊसतोड कामगार ललिता खेडकर, सोनाली केदार, वनिता आंधळे, ऊर्मिला गीते आदींनी तोडणीचे अनुभव व आरोग्याच्या समस्या मांडल्या. सचिन खेडेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.