नगर – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग 10 सामन्यांमध्ये विजय मिळवत अजिंक्य राहिलेल्या भारतीय क्रिकेट संघाने रविवारी होणारा अंतिम सामानही जिंकून क्रिकेटचा विश्वचषक जिंकावा. यासाठी नगरच्या विजेता क्रिकेट क्लबच्या वतीने शनिवारी ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्या चरणी विश्वचषकाची प्रतिकृती ठेवून महाआरती करून साकडे घालण्यात आले.
श्री विशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांच्या उपस्थितीत आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विश्वचषक प्रतिकृती गणेशाच्या चरणी ठेवून महाआरती करण्यात आली. तसेच येत्या डिसेंबर महिन्यात वाडियापार्क मैदनावर होणाऱ्या विजेता करंडक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाही यशस्वीपणे पार पडावी यासाठीही यावेळी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे मार्गदर्शक बाबूशेठ बोरा, बडीसाजन ओसवाल श्री संघाचे सचिव विशाल शेटिया, नगरसेवक विपुल शेटिया,प्रकाश भागानगरे, अतुल शिंगवी, अभिनंदन भन्साळी, मर्चंट बॅंकेचे संचालक कमलेश भंडारी, किशोर बोरा आदींसह विजेता क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघ सर्व सामने जिंकून अपराजित राहिला आहे. विजयाचे हेच सातत्य अंतिम सामन्यातही ठेवून भारतीय संघाने विश्वचषक जिंकून सर्व भारतीयांची इच्छा पूर्ण करावी. यासाठी श्री विशाल गणेशाचे आशीर्वाद भारतीय संघास मिळावेत. श्री विशाल गणेशाच्या आशीर्वादाने भारतीय संघ नक्कीच विश्वचषक स्पर्धेत अजिंक्य राहून वर्ल्ड कप जिंकून सर्वांचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास व्यक्त केला.