खातगाव टाकळी -हिवरे बाजार गावाच्या शिवारात प्रवेश करताच डोळ्यात भरणारी हिरवाई, नितळ पाण्याने वाहणारे ओढे, स्वच्छता,हिरव्यागार टेकड्या पाहून विदेशात असल्याचा भास होतो. आपल्या देशातही असे गाव असल्याचे पाहून आनंद वाटला, असे उद्गार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले.
पोलीस अधीक्षक ओला यांनी काल (शुक्रवार) हिवरेबाजारला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, राहुल गोंडू आदी उपस्थित होते. पद्मश्री पोपटराव पवार यांनी हिवरे बाजारमधील विविध विकासकामांची माहिती दिली.
ओला म्हणाले की, विद्यार्थी, ग्रामस्थ व महिला यांचा विकासप्रक्रियेत असलेल्या सक्रिय सहभागामुळेच हिवरेबाजारचे ग्रामविकास व आध्यात्मिक असा सर्वांगीण विकासाचे अग्रस्थानी उत्तम उदाहरण देशासमोर आहे. गावात झालेले इमारतीचे बांधकाम ब्रिटिशाची आठवण करून देतात. असे काम फक्त लोकांचा सहभाग असेल तरच शक्य आहे.