कोपरगाव : माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध ठिकाणच्या श्रीराम मंदिरांना भेट देऊन प्रभू श्रीरामांचे मनोभावे पूजन करून दर्शन घेतले. प्रभू श्रीरामाची महाआरती केली. ‘जय श्रीराम’ चा नारा देत प्रभू श्रीरामचरणी लीन होऊन त्यांनी श्रीराम नामाचा जागर केला. अयोध्येतील ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना भेटी देऊन प्रभू श्रीरामांना वंदन केले.
सोमवारी सकाळी कलावती कोल्हे यांच्यासमवेत धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संवत्सर परिसरातील दशरथवाडी येथील श्री गुरुदत्त मंदिरास भेट देऊन श्री गुरुदेव दत्ताची आरती करून पूजन केले. यावेळी मंदिरात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी टाळ वाजवून देवाची आराधना केली. त्यानंतर स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव बेट येथील श्रीराम मंदिर, सदगुरू श्री शुक्राचार्य महाराज मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे जाऊन मनोभावे आरती करून दर्शन घेतले. श्री शुक्राचार्य महाराजांची आरती केल्यानंतर त्यांनी श्रीराम, लक्षण व सीता मातेचे पूजन केले. यावेळी श्री शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, मंदिरप्रमुख सचिन परदेशी, मंदिर उपप्रमुख प्रसाद पऱ्हे, व्यवस्थापक राजाराम पावरा, अरुण जोशी, जयप्रकाश आव्हाड आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील श्रीराम मंदिर, बाजारतळ भागातील तुळजा भवानी मंदिर, जलाराम मंदिर, दत्तपार येथील श्रीराम मंदिर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, श्री साईबाबा मंदिर, हनुमाननगर भागातील श्री हनुमान मंदिर आदी विविध ठिकाणी भेट देऊन पूजा व आरती केली. शहरातील श्रीराम मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीतामातेचे पूजन व आरती केल्यानंतर त्यांनी भाविकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कोल्हे यांनी मंदिर परिसरातील कचरा स्वत:च्या हाताने उचलून स्वच्छता केली.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज सगळीकडे दिवाळीसारखेच उत्साही व मंगलमय वातावरण होते. विविध ठिकाणी असलेली श्रीराम मंदिरे व इतर मंदिरे आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती. चौकाचौकात, गावागावांत प्रभू श्रीरामांच्या मूर्ती, भव्य कटआऊट प्रतिकृती, भगवे झेंडे, पताका लावण्यात आल्यामुळे सर्वत्र ‘राम’ मय वातावरण दिसत होते. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ठिकठिकाणी श्रीराम नाम संकीर्तन, भजन, आरती, महाप्रसाद वाटप आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच घरोघरी रांगोळ्या काढून, दिवे-पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. गोदाम गल्ली भागात व्यापारी बांधवांनी प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या श्रीराम पूजन कार्यक्रमाला भेट देऊन पूजन करून दर्शन घेतले.