संगमनेर – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी दोनवेळा त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, दोन्हीवेळा ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी (दि.24) होणाऱ्या तिसऱ्या सुनावणीवेळी ते गैरहजर राहिल्यास त्यांच्या नावाने अटक वॉरंट निघण्याची दाट शक्यता होती. मात्र, सुनावणीच्या एक दिवस अगोदरच प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.वाघमारे यांच्यासमोर हजेरी लावून त्यांनी जामिनावर मुक्तता करून घेतली.
इंदुरीकर महाराज यांनी पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याचा आरोप करीत गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र, गर्भलिंग निदान प्रतिबंध (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार संगमनेरच्या न्यायालयात तक्रार केली होती. महाराजांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाने संगमनेर कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत त्यांना दिलासा दिला होता. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि राज्य सरकारच्यावतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
तेथे कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवण्यात आला. त्यावर इंदुरीकर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने सुनावणी करताना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायालयात इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात खटला पुढे चालू ठेवण्यात आला असून मागील तारखेच्या वेळी त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या या प्रकरणात दोन्ही सुनावण्यांच्या वेळी इंदुरीकर महाराज आलेच नाहीत. आता शुक्रवारच्या सुनावणीलाही ते गैरहजर राहिले तर न्यायालयाकडून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले जाण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. आता त्यांच्याविरोधात न्यायालयीन खटला सुरू राहील.