शेवगाव -लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र अमरापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानात आज (मंगळवार) तिसऱ्या माळेचे औचित्य साधून भाविकांनी उपस्थिती लावून आईसाहेबांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
पंचक्रोशीतील, तसेच कुलदैवत असलेल्या दूरदूरच्या हजारो भाविकांनी पायी येऊन दर्शनाची पर्वणी साधली. मढी, मोहटादेवीला जाणारे भाविकदेखील येथे आईसाहेबांच्या चरणी माथा टेकविण्यासाठी आले. शेवगावसह पाथर्डी तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या सहली आज दिवसभर चालू होत्या. देवस्थानातील वृक्षराईच्या सान्निध्यात पेव्हिंग ब्लॉकने सजविलेल्या प्रांगणात या बालगोपाळांनी दर्शनाबरोबरच विविध खेळ खेळून आनंद लुटला.रेणुका भक्तानुरागी मंगलताई व जयंती भालेराव, तसेच ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी दर्शन सुकर होण्यासाठी योगदान दिले.