दहिवडी – म्हसवड, ता. माण येथील एका महिलेचे बोगस मतदान कार्ड बनवून आणि तिला दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून, जमिनीचा दस्त केल्याप्रकरणी खरेदीदार, दलाल आणि साक्षीदारांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
म्हसवड येथील श्रीमती लक्ष्मी बजरंग कटकदवंडे (वय 78, सध्या रा. कन्नमवारनगर, विक्रोळी, मुंबई) यांची मासाळवाडी येथे गट नं. 860 (नवीन गट नं. 307) मध्ये सात हेक्टर 86 आर जमीन आहे. त्यापैकी दोन हेक्टर 27 आर जमिनीचा दस्त करण्यासाठी कटकदवंडे यांचे मतदान ओळखपत्र भांडुप विधानसभा मतदारसंघातील असताना, घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदान ओळखपत्र बनवण्यात आले.
त्यानंतर दहिवडी दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस महिला उभी करून दस्त करण्यात आला. प्रकरणी म्हसवड येथील. चंद्रकांत सोमेश्वर साखरे, महादेव सोमेश्वर साखरे, दीपक तिवाटणे, काळचौंडी, ता. माण येथील तुकाराम कृष्णा पावणे, साक्षीदार संपत बनगर (वरकुटे), नंदकुमार सोमेश्वर साखरे (रा. म्हसवड) आणि ओळखदार मारुती बाळू पवार यांच्यावर जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.