श्रीगोंदा – “माझ्या नवऱ्याला मेसेज का करतेस?” असे म्हणत महिला डॉक्टरने दवाखान्यातील नर्सला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका मोठ्या गावात घडला. याप्रकरणी सदर महिला डॉक्टरविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महिला डॉक्टर शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेआठच्या सुमारास नर्सच्या घरी गेली. त्यावेळी “माझ्या नवऱ्याला मेसेज का करतेस?” असे विचारले. त्यावेळी नर्सने “माझ्याकडे त्यांचा नंबर नाही” असे सांगत समजावून सांगितल्याचा राग आल्याने महिला डॉक्टरने शिवीगाळ करीत हातातील लोखंडी गज पाईपमध्ये टाकून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर पुन्हा माझ्या नवऱ्याच्या नादी लागली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले. गावात राहिली तर तुला सुपारी देऊन मारून टाकील आणि तुला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये काम करू देणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक जे .जे. बजंगे पुढील तपास करीत आहेत.