पिंपरी – शितळा देवी भजनी मंडळ, साई प्रतिष्ठान यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंडळाने यंदा 35 व्या वर्षांत पदार्पण केले आहे. यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथील नामदेव पायरीचा देखावा सादर करण्यात आला आहे.
घटस्थापनेनिमित्त मंडळाच्या वतीने देवीच्या मिरवणुकीमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तर, नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मंगळवारी संतवाणी व शौर्याची गाणी कार्यक्रम झाला. तर, येत्या 23 ऑक्टोबर रोजी निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे सायंकाळी 5 वाजता कीर्तन होईल. तर, रात्री 9 वाजता पंचक्रोशीतील भजनी मंडळांची सामूहिक जागराची सेवा होणार आहे. तसेच मंगळागौरी स्पर्धा व भोंडला होणार आहे. तसेच कुंकुम अभिषेक व वसंत हंकारे समाज प्रबोधनकार यांचे व्याख्यान होणार आहे.
21 ऑक्टोबरला जागर कुलस्वामिनीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर, रविवारी (दि. 22) होम हवन महाआरती व महाप्रसादाचे वाटप होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत नृत्य स्पर्धेची द्वितीय फेरी बुधवारी (दि. 18) व 24 ऑक्टोबरला अंतिम फेरी होणार आहे. 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
सर्व कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढत असल्याचे अध्यक्ष श्रीकांत घुले, उपाध्यक्ष सदानंद पाटील, कार्याध्यक्ष गणेश ठाकूर उत्सव प्रमुख कमलेश घुले यांनी कळविले आहे.