कोपरगाव -मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात “लेक लाडकी योजना’ सुरू करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, मुलींच्या सक्षमीकरणाला मोठे बळ प्राप्त होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारने ही योजना सुरू करून महाराष्ट्राला मोठी भेट दिली असून, या निर्णयाचे माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी स्वागत केले आहे.
कोल्हे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने व राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. आता राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने “लेक लाडकी योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेऊन गरीब कुटुंबांना मोठा दिलासा दिला असून, मुलीच्या माता-पित्यांची आर्थिक अडचण दूर होणार आहे. मुलींचे भवितव्य घडविणाऱ्या या योजनेमुळे प्रगतीला नक्कीच चालना मिळेल, असे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.