पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवडला जोडणाऱ्या हॅरिस ब्रीज ते अंडी उबवणी केंद्र (पुणे-मुंबई जुना महार्माग) रस्ता रुंदीकरणाची जागा लष्कराने महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे हा रस्ता 42 मीटर रुंद केला जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासह पुणे-पिंपरी आणि पिंपरी-पुणे प्रवास आणखी सोपा होणार आहे.
हॅरिस ब्रीज येथे पिंपरीच्या बाजूने रस्ता 50 मीटरपेक्षा मोठा, तर पुण्याचा बाजूला हा रस्ता 25 मीटरपेक्षाही कमी होता. त्यामुळे “बॉटल नेक’ स्थिती निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच खडकी स्टेशन ते हॅरिस ब्रीजपर्यंत महामेट्रोचे खांब रस्त्यातच आल्याने हा अरुंदपणा वाढला. त्यामुळे वाहतूकच बंद करण्यात आली होती. त्यावर रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने जागेची मागणी केली. लष्कराने त्यास मान्यता दिल्यानंतर महापालिकेने या रुंदीकरणासाठी निविदा काढली.
खडकी स्थानकासमोर लष्कराने भाडेकराराने दिलेली एक मिळकत आहे. ती काढणे आवश्यक आहे. या मिळकतीचा करार 2037 मध्ये संपणार आहे. तो रद्द करून मिळकत काढायची असल्यास त्याचा मोबदला कोण देणार? या वरून महापालिका आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डत एकमत नव्हते. तसेच मूल्यांकन कोणी करायचे हे निश्चित होत नव्हते.
अखेर विभागीय आयुक्तांनी यात तोडगा काढत मेट्रो मार्गास मान्यता देताना भविष्यात रस्ता रुंदीकरण करावे लागल्यास मेट्रोने खर्च करावा, असा करार झाला असल्याने या मिळकतीचा खर्च आता महामेट्रो देणार आहे. तसेच जागेचे मूल्यांकन सार्वजनिक बांधकाम विभाग करून देणार आहे. त्यामुळे या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.