Lake Ladki yojana : महाराष्ट्र गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींसाठी ‘लेक लाडकी’ ही कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. अर्थमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती त्यानुसार सरकार 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना १८ वर्षांपर्यंत पाच टप्यात एक ठराविक रक्कम देणार आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, अकरावीत प्रवेश घेण्यासाठी 8 हजार रुपये आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार आहे.अशी ही एकूण 1 लाख 1 हजार रुपये रक्कम मुलीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ कोणाला होणार ?
लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक ते दोन मुलींसाठी लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना आई वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करण आवश्यक आहे. महत्वाचं म्हणजे दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र त्यानंतर आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. लाभार्थीचे कुटुंब, बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज कुठे व कसा करायचा?
तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे. स्किनवर तुम्ही अर्जाचा फॉर्म पाहू शकता याच फॉरमॅटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. योजनेसाठीच्या शासन निर्णयात हा फॉरमॅट देण्यात आला आहे. एका साध्या कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकता.यात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घेणं आवश्यक आहे.
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे
– लाभार्थीचा जन्माचा दाखला
-कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे)
-लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल)
-पालकाचे आधार कार्ड
-बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
-रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत)
-मतदान ओळखपत्र
-शाळेचा दाखला
-कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
अर्ज केल्यानंतर पुढे अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे. त्यानंतर अर्ज संबंधित बाल विकास कार्यक्रम अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडे पाठवला जावा. प्रशासकीय यंत्रणेने अर्जाची प्रक्रिया 2 महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक आहे. लाभार्थीची ओळख पटल्यानंतर लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकारमार्फत जमा केली जाते.
राज्यातील २ ते ३ लाख मुलींना या योजनेचा फायदा होऊ शकतो असं सांगितलं जातंय. स्त्रीभृण हत्या रोखणं, मुलींचा जन्मदर वाढवणं त्यासोबतच मुलींच्या शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आलीय. या योजनेसाठी पात्र असलेल्या कुटुंबाने महत्वाची कागदपत्र तयार ठेवा.