संगमनेर – शहरातील दिल्ली नाका परिसरात पोलिसांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा संगमनेरकरांना विसर पडतो न पडतो तोच आज पहाटे तालुक्यातील वडगाव पान येथील बाप-बेटाच्या भांडणात पोलिसांनाच शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मार खावा लागला. यात तीन पोलिसांना हा प्रकार सहन करावा लागला असून, तिघेही जखमी झाले आहेत, तर दोघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बन्सी टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तेजस दत्तू काशीद आणि दत्तू काशिनाथ काशीद (दोघे रा वडगाव पान, ता. संगमनेर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या वेळी बाप-लेकांमध्ये भांडण सुरू होते.
या भांडणाचा आजूबाजूच्या नागरिकांना नाहक त्रास होत होता. त्यामुळे काशीद मळा येथील काही नागरिकांनी पोलिसांना दूरध्वनी करून भांडणाची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आले, तरी दोघांचे भांडण जोरदार सुरूच होते. दोघांचे भांडण सोडवण्याचा पोलिसांनीही प्रयत्न केला. या वेळी दोघांमध्ये मारामाऱ्या सुरू झाल्या होत्या, म्हणून पोलिसांनी तेजस काशीद याला पोलीस जीपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असता त्याने मज्जाव केला. तर दत्तू काशीद याने ही घरातील भांडणे आहेत आम्ही मिटवून घेतो असे पोलिसांना सांगितले. तसेच तुम्ही त्याला घेऊन गेले तर तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी त्याने दिली.
दरम्यान, तेजस याने हातात भाजी कापण्याच्या सुरीने पोलीस हेड कॉन्स्टेबल शेंगाळ यांच्या डोक्यात आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल घोलप यांच्या उजव्या हाताच्या बोटावर मारून दुखापत करून, तर दत्तू काशीद याने बन्सी टोपले यांना धक्काबुक्की करून काठीने मारहाण करत शिवीगाळ केली. त्यामुळे त्या दोघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे करत आहेत.