संगमनेर – येथील हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यांसह विविध स्मारकांसाठी भरीव निधी मिळावा, अशी मागणी आ. सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनात केली आहे. यामुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आ. तांबे यांनी या निधीची मागणी केली. या वेळी युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, मिलिंद औटी आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा केला आहे.
याकरिता संगमनेर नगरपालिकेने एसटी महामंडळाला जागा देण्यासाठी प्रस्ताव दिला असून, ही जागा तत्काळ मिळावी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेल्या सर्व तालुक्यांतील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ विश्व युद्धात सहभागी झालेले व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त शहीद नामदेवराव जाधव यांच्या स्मारकास एक कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा, फुले शाहू आंबेडकर स्मारक, संविधान प्रतिमा याचबरोबर शंभर फुटी झेंडा होणार आहे. या स्मारकांमुळे संगमनेरच्या वैभवात भर पडणार आहे.